अलिबाग दि.23 : रायगड जिल्हा प्रशासनामार्फत
सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे प्रशासनातील या तीनही प्रमुखांनी जिल्ह्यातील जनतेशी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला. सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील कोविड-19 ची सद्यस्थितीबाबतची माहिती दिली. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या, प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबतची माहिती दिली.
यावेळी जनतेने फेसबुकच्या माध्यमातून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना कोविड-19 बाबत विविध प्रश्न विचारले. त्यामध्ये स्थलांतरीत व्यक्तींच्या भोजन, निवारा व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य, मुक्या प्राण्यांची व्यवस्था, सुरु असलेल्या कंपन्यामधील कर्मचाऱ्यांची व्यवस्था, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, शेती व्यवसाय, नियंत्रण कक्ष असे प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना लॉकडाऊन मध्ये कडक बंदोबस्त ठेवून अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, जिल्ह्यामध्ये अनधिकृत दारु विक्री, ई-पास देणे, व्हॉटअपस्, सोशल मिडीयाचा दुरुपयोग, त्यावर कसे नियंत्रण ठेवले जाते, जिल्ह्यात केलेली कार्यवाही, शेती व्यवसाय कामकाजाबाबत त्यांना परवानगी देण्याबाबत रायगडकरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनाही जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांवर कसे नियंत्रण ठेवले जाते,याबाबत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहेत, त्यांना आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरविणे, ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा पुरविणेबाबत विविध प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांनाही हळदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.
फेसबुक लाईव्ह दरम्यान व्ह्यूव्हर्सनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, त्यातूनही ज्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देणे शक्य नव्हते त्यांना वैयक्तिक संदेश पाठवून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रविण बोने, वरिष्ठ तांत्रिक अभियंता शार्दूल भोईर, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्य्क केदार शिंदे,जगन्नाथ वरसोलकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी जनतेला रमजानच्या शुभेच्छा देत लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, सोशल डिस्टन्सिंग चे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा, करोनाविषयी काळजी करु नका तर काळजी घ्या, असे आवाहन केले आणि या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी झालेल्या सर्व रायगडकरांचे, प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे विशेष आभार मानले.