मुंबई दि. ६: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आज गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेश चतुर्थीच्या २ दिवस आधी म्हणजे ८ सप्टेंबरपासून ते अनंत चतुर्दशीच्या २ दिवसानंतर म्हणजे २१ सप्टेंबर पर्यंत टोल माफी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश एमएसआरडीसी, टोल कंपन्या आणि आरटीओ अधिकाऱ्यांना दिले. हे टोल पास आरटीओच्या माध्यमातून वितरित करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच गणेशभक्तांच्या प्रवासात त्यांना खड्डयांचा त्रास होऊ नये यासाठी एनएचएआय, पिडब्लूडी आणि एमएसआरडीसी यांना आपल्या अखत्यारितील रस्ते खड्डेमुक्त करून त्याठिकाणी टीम तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी संघटितपणे पेलण्याचे आवाहन सर्व विभागातील अधिकाऱ्यांना केले.
याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरटीओ आयुक्त, एनएचएआयचे अधिकारी, टोल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
