जाणून घ्या वेळा, कागदपत्रे व प्रक्रिया
पनवेल दि. १० : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना लोकल प्रवासासाठी महापालिकेच्यावतीने उद्यापासून प्रमाणपत्र पडताळणी करून प्रमाणित करून देण्यात येणार आहे. यानंतर या नागरिकांना लोकल प्रवासासाठी महिन्याचा पास मिळणार आहे. याचे प्रशिक्षण आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात देण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
ज्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी लोकल प्रवासासाठी प्रमाणपत्र घेण्यास येताना आपले अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स, लसीकरण केलेले प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन यायचे आहे. पनवेल स्टेशन, खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशन, खारघर स्टेशन याठिकाणच्या तिकीट घराबाहेर प्रमाणपत्र पडताळणी केंद्र पालिकेच्यावतीने उद्या पासून सुरु करण्यात येणार आहे. अशा नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन या नागरिकांना प्रवासासाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सकाळी ७ ते दुपारी 2 आणि दुपारी ३ ते रात्री १० अशा दोन शिफ्ट मध्ये हे काम सुरु असणार आहे.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, बाबासाहेब चिमणे रेल्वेचे अधिकारी सुधीर कुमार, व्ही. एल. गोयल उपस्थित होते.