ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
मुंबई, दि. 26 : मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिलेला अग्रलेख ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती. मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.
मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. “अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत :
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.