पनवेल दि: 20: पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगिण विकासासाठी मेहनत घेणारे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या पत्रातून गणेश देशमुख यांच्या बदलीला विरोध दर्शवून सक्षम अधिकारी म्हणून देशमुख यांनी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला आहे.
सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, कोरोना सारखे महाभयंकर संकट, तसेच पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई, पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूरप्रतिबंधक कामे, आरोग्य विभागाअंतर्गत शहरातील स्वच्छतेची कामे, महानगरपालिका क्षेत्रामधील होणारी नागरी सुविधा अंतर्गत ७१ गावांमधील स्मार्टसिटी अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना/ अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली ८000 झोपडपटटी धारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण अशा योजनांना खिळ बसून पनवेल महानगरपालिका सारख्या नवजात महानगरपालिकेचा बोजवारा उडून जनतेमध्ये हाहाकार माजेल व शासनाबददल जनतेमध्ये अविश्वास निर्माण होईल. आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याकरिता योग्य पद्धतीने उपाययोजना करून महापालिकेचे उत्पन्न वाढविले. तसेच त्यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना सारख्या रोगावर अतिशय योग्यरित्या उपाययोजना राबविल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे.पनवेल महानगरपालिकामध्ये पुर्वी कच-याची नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत होती. परंतु आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेची सुत्रे हातात घेतल्यापासून कचऱ्याच्या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण आले असून सध्या योग्य पध्दतीने कचरा उचलण्याचे काम सुरु आहे . त्याचबरोबर मागच्या वर्षी पावसाळयापूर्वीची होणारी नालेसफाई व पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता देखील गणेश देशमुख यांनी अतिशय उत्तमरित्या कामे केली आहेत. श्री. गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त झाल्यापासून नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील गावांना “स्मार्ट हिलेज’ करण्यामागे त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. एकूणच श्री. गणेश देशमुख यांचे अधिकारी म्हणून कार्य उल्लेखनीय असून त्यांची पनवेलकरांना गरज आहे. त्यामुळे विकासकामे पूर्णत्वास नेण्याकरिता आणि पनवेलकरांची भावना लक्षात घेता किमान डिसेंबर २०२० पर्यंत बदली रदद करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करून श्री. गणेश देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
