पनवेल दि १८ (हरेश साठे) मावळ लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या उरण, पनवेल, कर्जत विधानसभा संघातील कार्यकर्त्यांशी बुथ कमिटीच्या अनुषंगाने खासदार प्रकाश जावडेकर संवाद साधत आहे. आज त्यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना यावेळी खासदार प्रकाश जावडेकर यांनी, भाजपमध्ये बुथ कमिटीला महत्व असल्याचे सांगत मावळ लोकसभा मतदार संघातील बुथ अधिक सक्षम करण्यासाठी मोहिम सुरु असल्याचे सांगितले. राजकारणाच्या दृष्टीने बुथ जिता तो देश जिता हि महत्वपूर्ण संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ सक्षम करण्याची योजना आखण्यात आली आहे. भाजपचे ३०३ लोकसभेत खासदार आहेत, त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी पक्ष अधिक मजबूत करण्याचा आणि ज्या ठिकाणी खासदार नाहीत त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारतीय जनता पक्ष मेहनत करून जिंकणारा आणि दिवसाचे २४ तास काम करणारा पक्ष आहे. भाजप जनतेच्या ताकदीवर लढतोय, सर्वांचा विश्वास संपादन केलेला हा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकास कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत आहे, आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हंटले.
पंतप्रधान आवास योजना, शौचालय योजना, कोरोना प्रतिबंधात्मक लस, शेतकरी सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना, उज्वला योजना, ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत योजना, अन्न सुरक्षा योजना, अशा विविध लोकोपयोगी योजना राबवत देशाचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम यशस्वीपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच त्यांच्या दूरदृष्टी व कार्यक्षम नेतृत्वामुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोरोनाच्या वैश्विक महामारीत देशाला सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या लोकहित निर्णयामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण झाली. आतापर्यंत १९५ कोटी मोफत लसीकरण झाले. आणि हे महत्वाचे काम झाल्यामुळे आपला देश कोरोनाच्या संकटातून मोठ्या प्रमाणात बचावला. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या अनुषंगाने सर्वांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही जावडेकर यांनी केले.
मंत्री आदित्य ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावून निवडून आले आहेत, मात्र शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली असल्याचे जावडेकर यांनी अधोरेखित करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असल्याचे नमूद केले. दुसरा पावसाळा आला मात्र पहिल्या पावसाळ्यातील महापुराची भरपाई पूरग्रस्तांना राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अद्याप मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकार फक्त स्वतःचे भले करण्यात धन्य मानत आहे त्यांना जनतेशी काहीही घेणे देणे नाही. त्याचबरोबर या महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराची सर्व रेकॉर्ड मोडले असून लूट, लूट आणि लूट हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन प्रोग्राम आहे, असा सणसणीत टोला त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर लगावला. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे पण सत्तेसाठी त्यांची लाचारी सुरु आहे. महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर नेण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे, त्यामुळे जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमचा लढा जोरदार राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!