Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ मध्ये पनवेलकरांना सप्तसुरांची उधळण आणि सुमधुर सुरांचा साज अनुभवायला मिळाला. निरागस सुरांचा फराळ, विरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न पहाट वारा, सुर्याची सुवर्ण किरणे आणि क्षितिज्याला गवसणी घालणाऱ्या स्वरसम्राट राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सुरावर रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संपुर्ण सात्विक व मनमोहक वातावरणाने पनवेल मंत्रमुग्ध झाले होते. स्वरसम्राट राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सुश्राव्य गाण्यांची जुगलबंदी मैफिल अर्थात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या भव्य मैदानावर करण्यात आले होते. श्रोतेगण म्हणून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी यावेळी उपस्थित होती. उत्तम नियोजन, संयोजनामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागते होते. त्यामुळे सर्व श्रोत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले. यावेळी स्वरसम्राट राहुल देशपांडे व महेश काळे यांनीही त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत, अभंग, भक्तिसंगीत, सिनेसंगीतातील गाणी सादर केली गेली. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरला. ‘अलबेला सजन आयो रे’, ‘घेई छंद मकरंद’, ‘तेजाने झगमगले आज’, ‘मन मंदिरा’, ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा अनेक गाणी अप्रतिम सादर करून रसिकांमध्ये चैतन्य खुलविले. त्यांनी दिलखेच अदाकारी सादर केली त्याचबरोबरीने तबला, पेटी, पखवाज, हार्मोनियम अशा वाद्यवृंद समूहानेही आपल्या वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली. पहाट एवढी रंगली होती कि यावेळी उपस्थितांनीही सुरांचा ठेका धरला होता.