महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त उपक्रम
पनवेल दि.३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तथा लोकशाही उत्सवानिमित्त दिनांक 29 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी दरम्यान राष्ट्र सेवा दल इचलकरंजीच्या स्मिता पाटील कलापथकाच्या वतीने पनवेल तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज आणि गावांमध्ये ‘पुन्हा गांधी’ ह्या रिंगण नाट्याचे प्रयोग करून गांधी विचारांचा जागर करण्यात आला. राष्ट्र सेवा दल ही समाजवादी संघटना आणि 42 च्या ‘चले जाव’ आंदोलनातील प्रमुख नेते युसुफ मेहेरली यांच्या नावाने काम करणाऱ्या पनवेल तालुक्यातील युसुफ मेहरअली सेंटरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधिंची ७५ वे स्मृतिदिन आणि लोकशाही उत्सव अंतर्गत येथील भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तारा, मधु-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी, दादामीया दिवाण उर्दू हायस्कूल आपटा, लाडिवली गाव, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महात्मा गांधी चौक आणि संविधान कट्टा या ठिकाणी “पुन्हा गांधी” या रिंगण नाट्याचे प्रयोग करण्यात आले. स्मिता पाटील कलापथक, इचलकरंजी येथील कलाकारांनी या नाटकाचे सादरीकरण करून महात्मा गांधींना मारणार्यांना गांधींचे विचार मारता आले नाहीत याउलट गांधींच्या अहिंसात्मक विचारांवर भारत देशच नव्हे तर जगातील विविध देश अनुकरण करून अन्यायाविरोधात संघर्ष करीत आहेत ते सर्व गांधीमार्गावर चालणारे अनुयायी वाटतात आणि संघर्षात कृतिशील विवेकी संवादाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे “पुन्हा गांधी” या रिंगण नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे ह्या नाटकाचे लेखक, निर्माते संजय रेंदाळकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या विजया चौहान, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, मुख्याध्यापक रत्नाकर भोईर, मुख्याध्यापक किफायत अंतुले आणि सेंटर समन्वयक बाळकृष्ण सावंत यांच्या पुढाकाराने प्रयोग करण्यात आले. प्रयोग संयोजनात राजू पाटील, सचिन पाटील, मानसी पाटील, तेजस चव्हाण, रवी पवार, अब्रार मुल्ला, राजेश रसाळ, विजया मांडवकर, उदय गावंड, प्रथमेश पाटील यांनी मोलाचा वाटा उचलला.