अलिबाग, दि.26: वारांगणा हा घटक समाजातील अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा एक घटक आहे,ज्याच्याकडे सर्वसामान्य नागरिक जाण्यास धजावत नाही. या महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रय करुन लाजिरवाणे जीवन जगत आहेत. परंतु हा घटकसुध्दा या समाजव्यवस्थेमुळेच तयार झाला आहे, हे आपणाला मान्य करावेच लागेल. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने समाजातील हा घटक मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाकडून सर्व कष्टकरी, मजूरवर्गीय जनतेला विविध प्रकारच्या माध्यमातून मदत होत आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत आहे. परंतु या महिलांकडे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या शासनाच्या या लाभापासून वंचित आहेत,त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
मात्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही बाब जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी चौधरी यांनी तात्काळ जिल्ह्यात या महिला कोठे आहेत, किती आहेत याची सविस्तर माहिती व शोध घेण्यासाठी गायकवाड यांना सूचित केले.
गायकवाड यांनी या गोष्टीचा शोध घेतला असता त्यांना पनवेल शहर,मुंबई-पुणे महामार्गालगत साधारणत: 175 ते 200 शरीरविक्रय करणाऱ्या महिला आढळून आल्या. या महिलांची यादी व मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यावर त्यांनी विनाविलंब पनवेल तहसिलदार अमित सानप यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गायकवाड यांच्याशी समन्वय साधून या महिलांना कोणत्याही रेशनकार्ड, आधारकार्डची सक्ती न करता आवश्यक ती सर्व मदत तातडीने करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पनवेल तहसिलदार सानप यांनीही तत्परतेने कार्यवाही करत या महिलांना साठ रेशन किटस उपलब्ध करुन दिले. या उपक्रमात महिलांसाठी काम करणाऱ्या आश्रय सेाशल फाऊंडेशन पनवेल अध्यक्ष अशोक गायकवाड, श्रीमती दिप्ती रामरामे, तालुका संरक्षण अधिकारी कैलास डोईफोडे, सहाय्यक तालुका संरक्षण अधिकारी व नायब तहसिदार आदमाने यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!