कोण पटकवणार मानाचा अटल करंडक
पनवेल दि.३०: शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आज रविवार दिनांक ३० जानेवारीला सायंकाळी होणार असून यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, तर पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉ.नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना ‘गौरव रंगभूमीचा’ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे असणार आहे.
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आला असून यंदाही या स्पर्धेला कलाकार, संस्था, नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून थिएटर हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!