पनवेल दि.१९ : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे.
अविनाश कोळी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम करीत भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस, नंतर भाजप मंडल चिटणीस, सरचिटणीस, जिल्हा संघटन सरचिटणीस आणि पक्षाने केलेल्या आवाहनानुसार पूर्णवेळ विस्तारक म्हणून रायगड लोकसभा क्षेत्रात काम केले आहे. संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यात ते यशस्वी झाले आहेत.
धैर्यशील पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहेत. त्यांनी वडील आणि माजी मंत्री मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शांत, संयमी असलेले पाटील शेकापमधून भाजपत दाखल होत सक्रिय झाले आहेत.
या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अविनाश कोळी व धैर्यशील पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.