पनवेल दि.9: नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या विषयावर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८) रात्री बैठक झाली. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मनसेचे आमदार राजू पाटील, कॉ. भूषण पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष व उपमहापौर जगदिश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, जे. डी. तांडेल, गुलाबराव वझे, तसेच महाविकास आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी विमानतळ परिसरातील इतर ठिकाण सरकारला सूचविण्याचा सल्ला समितीला दिला. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील आदरणीय आहेत. त्यांनी केलेले कार्य महान आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जनमताने निश्चित झाल्याचा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीने या बैठकीपूर्वी ‘प्री-प्लॅन’ केल्याचे अधोरेखित झाले. असे असले तरी कृती समितीने आम्हाला कुठलाही पर्याय नको, ‘दिबां’चेच नाव नवी मुंबई विमानतळाला पाहिजे, असा निर्धार जाहीर केला.
या वेळी समितीने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत २०१५ पासून ‘दिबां’चे नाव देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. हवाई वाहतूक मंत्र्यांपासून ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. असे असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव आणणे संयुक्तिक नाही, असे म्हटले, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित झाल्याने ‘दिबां’चे नाव देता येणार नाही, असे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री ठाकरे यांनी समितीला सांगितले. असे असले तरी समितीने फक्त आणि फक्त ‘दिबां’चेच नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे व त्यासाठी संघर्षाची तयारी दर्शवत १० जूनला मानवी साखळी आंदोलन तर २४ जूनला सिडकोला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबई विमानतळ नामकरणासंदर्भात जरी पुन्हा बैठक घेऊ असे सांगितले असले तरी शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी न्हावा-शेवा सी लिंक किंवा एका टर्मिनलला नाव देण्याचा प्रस्ताव दिला. ते पाहता यांचे पूर्णपणे आधीच ठरलेले दिसतेय. त्यामुळे आपण सगळ्यांनी दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यासाठी संघर्षात उतरले पाहिजे. आंदोलनात कोविडचा प्रोटोकॉल पाळू, पण तो पाळत असताना आम्हाला साखळी आंदोलन करण्यास रोखल्यास ठरलेल्या आपापल्या योजनेप्रमाणे जनतेला त्रास न देता रस्त्यावर उतरून ‘दिबां’च्या नावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू या. आपण १० आणि २४ तारखेला जोरात लढायचे आणि भूमिपुत्र किती प्रखर आहेत आणि भूमिपुत्रांच्या भावना किती प्रखर आहेत हे सरकारला दाखवून दिल्याशिवाय हा निर्णय बदलेल, असे वाटत नसल्याचे या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.