पनवेल दि.५: हनुमान चालीसा आणि त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेले प्रतिकात्मक आंदोलन राजद्रोह कसा होऊ शकतो, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी ठाकरे महाविकास आघाडी सरकारला दि. ०४ मे रोजी पनवेल येथे केला. तसेच कोर्लई अलिबाग येथील १९ बंगला घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास सोमेय्या यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील उपस्थित होते.
यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसेच सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांचे कनेक्शन फक्त ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांसाठी झाले असल्याचे अधोरेखित करतानाच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची संशयास्पद भूमिका प्रकर्षाने मांडली.
हनुमान चालीसाचे मातोश्री बाहेर पठण करण्याचा प्रामाणिक उद्देश घेऊन राणा दाम्पत्य मुंबईत आले मात्र ठाकरे सरकारला त्याची चीड आली आणि त्यांच्यामागे कार्यकर्ते आणि पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आला. आणि त्याच्यापलीकडे जाऊन त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. धार्मिक आणि सामाजिक भावना लक्षात घेता हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अत्यंत निषेधार्थ आहे. उद्या पोलीस कोठडीतून नवनीत राणा आणि रवी राणा यांची सुटका झाल्यानंतर मी त्यांची मुंबईत भेट घेणार आहे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल त्यांची माफी मागणार आहे, असे आवर्जून नमूद करतानाच हिंमत असेल तर त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करायला गुंड पाठवावेत, असे आव्हानही त्यांनी ठाकरे यांना केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुपारी देऊन तीन वेळा माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रत्येकवेळी मी वाचतो हे उद्धव ठाकरे यांचे दुर्देव आहे, असा घणाघाती हल्ला सोमय्या यांनी केला.
मात्र देव आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने मी वाचलो आहे, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाचे प्रमुख सांगतात त्याप्रमाणे प्रवक्ता बोलत असतो आणि तेच संजय राऊत वायफळपणे बोलत असतात असे सांगतानाच संजय राऊत यांनी माझ्यावर बारा आरोप केले पण एकही आरोपाची कागदपत्रे सादर करू शकले नाहीत त्यामुळे संजय राऊत डरपोक आहेत हे सिद्ध झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि सचिन वाझे प्रवक्ता होते आणि त्यानंतर ठाकरे सरकार आल्यावर सचिन वाझेची पुनर्नियुक्ती ठाकरे सरकारने केली. सचिन वाझे १०० कोटी वसूली हि ठाकरे सरकारची योजना आहे आणि मनसुख हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारमुळे झाली आहे, असा सणसणाटी आरोपही त्यांनी केला.
कोर्लई अलिबाग येथील १९ बंगला घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईकांकडून कोर्लई येथे ९.५ एकर जमीन १९ बंगल्यासह विकत घेतली. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीय या ५. ४२ कोटी किंमत असलेल्या १९ बंगल्याची १ एप्रिल २०००९ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कर भरत होते. पण इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये हे बंगले दाखवले गेले नाहीत असे सांगून या विषयावर आज अलिबाग येथे १२ वकिलांशी जवळपास एक तास चर्चा केली असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आणि त्या संदर्भात पुढील दहा दिवसात याचिकेचे काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नमूद करून किरीट सोमेय्या यांनी आणखी एक बॉम्ब टाकला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!