ठाणे दि.13: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे उद्या असून नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन ६ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत करायचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. यंदा दिवाळी तीन दिवसच आहे. यावर्षी शनिवार म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आहे त्यामुळं या दिवशी चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान करायचं आहे. उद्या दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी आश्विन कृष्ण चतुर्दशी संपते आणि प्रदोषकाली आश्विन अमावास्या आहे त्यामुळं शनिवार १४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशीच्या दिवशीच प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत लक्ष्मी-कुबेर पूजन करायचं असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.