नवी मुंबई दि.27: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी 5 पेक्षा अधिक कोरोना बाधित व्यक्ती 100 मीटरच्या क्षेत्रात जवळजवळ आढळून येतात अशी क्षेत्रे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) म्हणून नियमित जाहीर करण्यात येतात. दिनांक 25 जून 2020 रोजी अशी 34 क्षेत्रे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.
या व्यतिरिक्त कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागील 15 दिवसांत ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित सापडले आहेत अशी कोरोनाचा हॉटस्पॉट असणारी दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव, सेक्टर 12 खैरणे बोनकोडे गाव, सेक्टर 19 कोपरखैरणे गाव, राबाडे गाव, चिंचपाडा ऐरोली अशी 10 मोठी क्षेत्रे 29 जून ते 5 जुलै 2020 या कालावधीत विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) म्हणून महापालिका आयुक्त मिसाळ यांनी घोषित केली आहेत.
या दहा मोठ्या विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक काम अथवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर येणे – जाणे यावर प्रतिबंध असणार आहे. त्याचप्रमाणे या 10 विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन महानगरपालिकेमार्फत मास स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी व संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.