पनवेल दि.६: गजलकार ए. के. शेख म्हणजे गजलचे चालते बोलते विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी पनवेल येथे रविवारी, ४ जून रोजी केले. ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या “मी योजिले मनाशी” या आत्मचरित्रासह दहा पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गजलनवाज भीमराव पांचाळे होते. त्याचबरोबर माजी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, ठाण्याचे आयुक्त संदीप माळवी, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, प्राचार्या डॉ. रमा भोसले, राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भीमराव म्हणाले की, कित्येक गजलकार स्वतः खूप चांगल्या गजल लिहितात. परंतु नवीन गजलकार तयार करण्याच्या बाबतीत मात्र ते उदासीन असतात. ए. के. शेख मात्र पनवेलच्या गजलग्रुपच्या माध्यमातून नवोदित कवींना गजलचे धडे देतात. शेख सरांनी स्थापन केलेला गजलग्रुप केवळ पनवेलचा न राहता तो आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पसरलेला आहे. त्यांचे गजलसाठीचे योगदान खूप मोठे आहे.
या कार्यक्रमात ए. के. शेख यांच्या “मी योजिले मनाशी” या आत्मचरित्रासह “दीवान-ए-एके” हा गजल दीवान, दिवाकर वैशंपायन यांचा “लळा-जिव्हाळा” हा गजलसंग्रह, डॉ. सुभाष कटकदौंड यांचे “डॉक्टर माझे गर्भाशय मला परत हवंय” ही एकांकिका, तसेच “पुन्हा एकदा नव्याने जगायचे मला” हे दोन अंकी नाटक, डॉ. आशा श्रॉफ यांचे “रंग-बिरंगी” हे कविता आणि किस्स्यांचे पुस्तक, वाय. के. शेख यांचे “मनाचे किनारे” हा कवितासंग्रह, नंदकुमार शिंदे यांची “रात्र पावसाची” ही कादंबरी, तसेच गजलग्रुपचे दिवंगत सदस्य गजलकार सदानंद रामधरणे यांचा “स्वप्न” हा गजलसंग्रह, सुभाष पवार यांचा “स्वप्न झुला” हा गजलसंग्रह प्रकाशित झाले. हे दोन्हीही गजलसंग्रह गजलग्रुपतर्फे प्रकाशित करण्यात आले.
प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा डॉ. अविनाश पाटील, गोपाळ कांबळे, सुधाकर चव्हाण, प्रमोद खराडे, संदीप बोडके, सतीश अहिरे, प्रभाकर पवार, रोहिदास पोटे, डॉ. रमा भोसले यांनी अभ्यासपूर्ण परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख अतिथी आयुक्त संदीप माळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी आपल्या मनोगतात, शेख साहेबांचे आत्मचरित्र स्वतंत्रपणे प्रकाशित झाले असते, तर आम्हाला त्यावर विस्तृत बोलता आले असते, अशी खंत व्यक्त केली. पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांनी, आपल्या राजकीय कारकिर्दीत शेख साहेबांचे सल्ले आपल्याला कसे वेळोवेळी उपयोगी पडले हे सांगितले. अध्यक्षीय भाषणात गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या गजल गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!