पनवेल दि.५: महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी आज येथे दिली.
उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले. त्यावेळी त्या बोलत होत्या. .
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकर, उपाध्यक्षा रिधा रशीद, महापौर कविता चौतमोल, पनवेल पंचायत समिती सभापती देवकुबाई कातकरी, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, तालुका मंडल अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग क समिती सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग ड समिती सभापती सुशीला घरत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उमाताई खापरे यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, महिला मोर्चा हि महिलांची ताकद आहे. भाजपमध्ये महिलांना सातत्याने सन्मानाची वागणूक आणि आदराचे स्थान दिले जाते. त्यामुळे महिला मोर्चा उत्तमपणे काम करीत पक्षाच्या आणि समाजाच्या कार्यात सक्षमपणे काम करीत आहे. कोरोना काळात फक्त आणि फक्त भाजप कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आणि यामध्ये महिला मोर्चाचा सहभाग होता, याचा अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले. संघटनात्मक कोकण दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने महिला मोर्चाची फळी अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून त्यानुसार वकील, डॉकटर, पत्रकार, नर्स, आशा सेविका, खेळाडू अशा विविध क्षेत्रातील महिलांची सक्षम टीम निर्माण करणार असल्याचे जाहीर केले. हि टीम महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी काम करेल, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोविड सेंटरमध्ये झालेल्या घटना, बालिकांवर झालेले अत्याचाराने राज्य दहशतीखाली आला आहे. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री त्याकडे कानाडोळा करीत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेकवेळा या संदर्भात पत्रव्यवहार, आंदोलन केली मात्र हे राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. महिला आयोग, बाल आयोगाला हे सरकार अद्याप अध्यक्ष देऊ शकले नाहीत तसेच दिशा कायदा अंमलात आणला नाही. झोपलेल्याला जागे करता येते पण सोंग घेतलेला जागा होत नाही, तशीच परिस्थिती झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारची झाली आहे, असा सणसणीत टोलाही उमाताई खापरे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
या बैठकीत, कोरोना काळात नागरिकांना भरभरून मदत करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जिल्हा महिला मोर्चाच्यावतीने उमाताई खापरे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, त्याला टाळ्यांच्या गजरात सर्वानी अनुमोदन दिले.
यावेळी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यानुसार उत्तर रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी आश्विनी पाटील, सरचिटणीसपदी मृणाल खेडकर, उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, संगिता पाटील, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्ये, चिटणीसपदी कुंदा मेंगडे, जयश्री धापटे,सदस्यपदी आशा म्हस्कर, अनिता शहा, सोशल मिडिया जिल्हा संयोजकपदी गायत्री परांजपे, यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी यांनी, भाजप ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर स्वतः’ या उद्देशाने काम करीत असल्याचे सांगून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्याचे नमूद केले. भाजप देशाचा विचार करणारा पक्ष आहे तर बाकी पक्ष एका घराण्यापुरते मर्यादित राहिल्याची टीकाही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सारखे सक्षम व डॅशिंग नेतृत्व या विभागाला लाभला असल्याचे त्यांनी अधोरेखित करून त्यांच्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा रिधा रशीद, महापौर कविता चौतमोल यांनी हि महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक महिला कार्यकर्त्याने नवीन महिलेला पक्षाशी जोडत पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करावी, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक तर चारुशीला घरत व मृणाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
