पनवेल दि.20: पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सूट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महापालिका आयुक्तांसह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
पटवर्धन यांनी निवेदनात नाट्यगृह नव्याने सुरू होताना आसन क्षमतेपेक्षा 50 टक्के जागा उपलब्ध असणार आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने ठाणे व नवी मुंबई महापालिकेने तिकिट दर 400 रुपयांपर्यंत असणार्या नाटकांना भाड्यात 75 टक्के सूट देऊन नाट्यसृष्टीस पुन्हा उभे करण्यासाठी मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर विचार करावा व मनोरंजनाच्या सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांना किमान 50 टक्के सवलत द्यावी. यासह नाट्यगृहाची दुरुस्ती तसेच अन्य सुविधांसंदर्भात मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये पनवेल महापालिकेकडून 50 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.