आ.प्रशांत ठाकूर यांनी केली पनवेलच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी
पनवेल दि.१२: पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करते वेळी केले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत उमेश इनामदार व प्रकाश खैरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्य स्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक पद्धतीने या वॉर रूममध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल मधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली, आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडी संदर्भात सुद्धा चर्चा झाली व लवकरच वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने यांसंदर्भात सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!