अलिबाग दि.16: कोरोनामुळे रखडलेला बारावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात राज्यात कोकणने तर मुंबई विभागातून रायगडने पहिला क्रमांक पटकावला आहे. रायगडचा निकाल 91.28 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या 29 हजार 718 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 128 विद्यार्थ्यांनी करिअरला कलाटणी देणारा बारावीचा टप्पा पार केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (16 जुलै) दुपारी 1 वाजता मंडळाच्या http://mahresult.nic.in/default.htm या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. रायगडात रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने, सायबर कॅफे बंद असून, विद्यार्थी मोबाईलवरच निकाल पाहत आहेत. ग्रामीण भागात खराब नेटवर्कमुळे अनेकांना निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत.
बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा एकूण निकाल 89.35 टक्के लागला आहे. मुंबई विभागातून 3 लाख 13 हजार 291 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 79 हजार 931 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागातून रायगड जिल्ह्याने बारावीत पहिला क्रमांक पटकावला आहे. रायगडचा निकाल 91.28 टक्के लागला आहे. मुंबई विभागात येणार्या ठाणे जिल्हा 89.86 टक्के, पालघर 89.85 टक्के, ग्रेटर मुंबई 86.72 टक्के, मुंबई उपनगर-1 चा निकाल 88.54 टक्के, मुंबई उपनगर-2 चा निकाल 90.21 टक्के लागला आहे.
रायगड जिल्ह्यातून परिक्षेला बसलेल्या 29 हजार 718 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 128 विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असलेला बारावीचा टप्पा पार केला आहे. यापैकी 2 हजार 33 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर 7 हजार 926 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 15 हजार 557 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. रायगडात विज्ञान शाखेचा निकाल 97.24 टक्के, कला शाखेचा निकाल 80.49 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 93.18 टक्के तर एचएससी-व्होकेशनल शाखेचा निकाल 84.55 टक्के लागला आहे.
