अलिबाग,दि.7 : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यात अडकलेल्या बिहार राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने बिहारमधील दानापूर येथे काल पाठविण्यात आले. तब्बल 43 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.
यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिद्दे, तहसिलदार अमित सानप आदी उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा या राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पुढील समन्वयाबाबतचे नियोजन केले आहे. अशाच प्रकारे मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा या राज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले मजूर/व्यक्ती यांना त्यांच्या राज्यातील स्वगृही पाठविण्यात येणार आहे. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले.